देवगड / प्रतिनिधी
देवगड तुळशीकाटे परिसरातील देवगड कॉलेजसमोर वास्तव्यास असणारा संकेत दिलीप चव्हाण (वय३५) याचा कागल (जि. कोल्हापूर) तालुक्यातील मुरगुड येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना २४ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या अपघाती निधनामुळे देवगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत चव्हाण हा पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेले चार महिने तो ‘वर्क फॉर्म होम’ करीत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही कामानिमित्त तो आपल्या मूळ गावी मुरगुड येथे गेला. रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने तो निपाणीकडे जाण्यास निघाला. घरापासून सुमारे पाच कि. मी. अंतरावरील देवचंद कॉलेजसमोरील रस्त्यावरील स्पीडब्रेकरवर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो रस्त्यावर फेकला जात जागीच गतप्राण झाला. घटनेचा पंचनामा स्थानिक पोलिसांकडून करण्यात आला. बुधवारी दुपारच्या सुमारास पार्थिवावर मुरगुड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. देवगडच्या दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा तो मुलगा होता.













