चैत्रातील चैतावली उत्सव म्हणजे सांस्कृतिक परंपरेचा वारसा

२ एप्रिल पासून होणार चैतावली उत्सवाला प्रारंभ

संतोष कुळे
चिपळूण : शिमगा सणानंतर आता सर्वांना वेध लागले ते ग्रामदेवतेच्या चैतावली उत्सवाचे. चैत्र महिन्यात होणाऱ्या या चैतावली उत्सवाचा आता २ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. भक्तीचा जल्लोष आणि ढोल ताशांचा गजर याने वातावरण भक्तिमय होणार आहे. चैतावली उत्सव म्हणजे सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. यात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते.

चिपळूण तालुक्यात अनेक गावांतून देवीचा चैतावली उत्सव होत असतो. या उत्सवात अनेक ग्रामदेवतेच्या पालख्या भेटीसाठी दुसऱ्या ग्रामदेवतेकडे जात असतात. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चैतावली उत्सवाचा रंग हा वेगळाच असतो.
तालुक्यात २ एप्रिल पासून चैतावली उत्सव रंगणार आहे. यामध्ये हनुमान जयंती पौर्णिमा ते चैत्र अमावस्या पर्यंत चिपळूण तालुक्यात हा चैतावली उत्सव होत असतो. लहान थोर सर्वच भाविक या चैतावली उत्सवाचा आनंद घेत असतात.
यात हनुमान जयंती दिवशी गुरुवार दिनांक २ रोजी पोसरे आणि कापसाळ, शुक्रवार दिनांक ३ रोजी कोंढे, शनिवार दि. ४ रोजी रेहळे आणि रामपूर चव्हाणवाडी, रविवार दि. ५ दोनवली आणि मिरजोळी, सोमवार दि. ६ रोजी भोम, मंगळवार दि. ७ रोजी मजरे कौंढर नवरतवाडी आणि पाचाड येथे चैतावली उत्सव होईल.
त्यानंतर गुरुवार दिनांक ९ रोजी वैजी, शुक्रवार दि. १० कात्रोळी देऊळवाडी, दि. १२ रोजी कात्रोळी लायकवाडी, सोमवार दिनांक १३ रोजी शिरळ, मंगळवार दि. १४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी चैतावली यात्रा रामपूर केदारनाथ तळ्याची वाडी होणार आहे.
तालुक्यात अजूनही काही ठिकाणी हा उत्सव होत असतो. उपलब्ध झालेल्या माहिती नुसार वरील तारखा दिल्या आहेत.
चैतावली उत्सव म्हणजे सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामदेवतांच्या पालख्यांची अनोखी स्नेहमिलन भेट आहे. भेटीचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येत असतात. आकर्षक सजावट आणि अनोखी विद्युत रोषणाई ही खास आकर्षण असते. पालख्या नाचविणे, ढोल वाद्य आणि त्यांची जुगलबंदी बघायला मिळते. सर्वांना आता या चैतावली उत्सवाचे वेध लागले आहेत.