राजापूर तालुक्यातील वाटुळ गाव परिसरात अवकाळी पाऊस आणि गारांचा वर्षाव

राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील वाटुळ गाव परिसरात आज अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
या अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांवर गारांच्या माऱ्यामुळे परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही ठिकाणी झाडांची फांदी मोडणे, कच्च्या आंब्यांची गळती होणे अशा घटना घडल्या.
ग्रामस्थांनी सांगितले की, अचानक आलेल्या या बदलामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. वीजपुरवठ्यावरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे समजते.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.