खेड – राकेश कोळी : बहुचर्चित भरणे–खेड–दापोली मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून, भरणे ते अण्णाचा पऱ्या या दरम्यानची दुहेरी मार्ग येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू करण्याचे नियोजन असून, अण्णाचा पऱ्या ते हॉटेल कॅफे कॉर्नर या टप्प्यातील काम मात्र पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता श्रीमती जठाल यांनी दिली.
भरणे ते खेड दरम्यानच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या मार्गिकेचे काम तब्बल पाच महिने लांबल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता दिलेली ३० एप्रिलची डेडलाईन ठेकेदार पाळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दापोली–खेड या २९ किमी अंतराच्या मार्गावर विविध ठिकाणी काम सुरू आहे. खेड शहरातील तीनबत्ती नाका ते डेंटल कॉलेज या दरम्यानचे काम संथ गतीने सुरू असून, सुर्वे इंजिनिअरिंग जवळील मोरी काढून त्या ठिकाणी सुमारे ८ फूट उंच पूल उभारण्यात येत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी हा उपाय करण्यात येत आहे. तसेच नगरपरिषदेची पाण्याची पाईपलाईन रस्त्याखालून हलवून बाजूला नेण्याचे काम सुरू असल्यानेही काही प्रमाणात विलंब होत आहे.
या प्रकल्पांतर्गत अण्णाचा पऱ्या ते कॅफे कॉर्नर हा रस्ता १५ मीटर रुंद, खांबतळे ते नाना नानी पार्क १२ मीटर, तर नाना नानी पार्क ते डेंटल कॉलेज हा रस्ता १५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. खांबतळे येथील धोकादायक वळण कमी करण्याचे कामही प्रस्तावित आहे. मात्र खांबतळे ते अण्णाचा पऱ्या या दरम्यानची जमीन अद्याप नगरपरिषदेच्या ताब्यात आलेली नसून, पाईपलाईन बदलण्याचे कामही अपूर्ण असल्यामुळे या टप्प्यातील काम पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बसस्थानक ते डेंटल कॉलेज या दरम्यान पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असला तरी या मार्गावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्त्यावर खडी टाकण्यास काही जागामालकांचा विरोध असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. तसेच मातीच्या भरावावर पाणी टाकल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. अण्णाचा पऱ्या ते बसस्थानक या टप्प्यात काम सुरू करताना वाहतूक वळविण्याचे मोठे आव्हान उभे राहणार असून, यासाठी नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष नियोजन करावे लागणार आहे.
याबाबत बोलताना खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले की, टाऊन प्लॅनिंग विभागाकडून सर्च रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर संबंधित जागामालकांना लवकरच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अण्णाचा पऱ्या ते कॅफे कॉर्नर या टप्प्यातील काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल.
एकंदरीत, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने दिलेली डेडलाईन प्रत्यक्षात पाळली जाते का, याकडे आता खेडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.











