झाडाला गळफास स्थितीत होता मृतदेह ; पोलीसांकडून तपास सुरू
मालवण | प्रतिनिधी : कोळंब खडवणनाका येथील रहिवासी लाडोबा मेघश्याम लाड (३५) याचा मृतदेह नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. लाडोबा हे देवगड एसटी आगारात वाहक म्हणून गेली १५ वर्षे नोकरीस होता. त्याच्या आकस्मित निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला धक्का
बसला आहे.
लाडोबा लाड हे नाना लाड या नावाने ओळखले जात. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
त्याच्या निधनाची माहिती
मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
शनिवारी दुपारी कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. नाभिक समाज बांधवांच्यावतीने कोळंब स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
नाना लाड हे वाहक म्हणून सन २००९ मध्ये नोकरीस देवगड एसटी डेपो याठिकाणी सेवेत रुजू झाले होते. त्यांना अनेकदा मालवण येथे बदली करून घेण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांच्या कामातील दर्जेदारपणामुळे एसटी प्रशानाकडून त्यांना देवगडमध्येच काम करण्याची विनंती करण्यात येत असल्याने त्यांनी त्याचठिकाणी गेली पंधरा वर्षे सेवा बजावली होती. गेले काही दिवस ते सुट्टीवर असल्याचे देवगड मधील त्याच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत होते.
नांदरुख सतीची खाण परिसरात
नाना लाड यांची दुचाकी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. जंगलमय भागातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या
स्थितीत त्यांचा मृतदेह सापडून आला. नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास
घेतल्याचे दिसून आले. स्थानिक सरपंच व पोलीस पाटील यांनी एक दुचाकी संशयास्पदरित्या रस्त्यावर असल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी गाडीच्या
नंबरवरून शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी नाना लाड घरी नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. यामुळे घटनास्थळी जात पोलीसांनी शोध घेतला असता लाड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. नाना लाड यांचा चुलत भाऊ गौरव लाड यांनी पोलीसांत माहिती दिली. पोलीसांनी आकस्मित मृत्यू नोंद करत मृतदेह विच्छेदन
करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. शनिवारी सकाळी त्याचा
भाऊ मुंबई येथून आल्यानंतर विच्छेदन करण्यात आले. मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घरी नेल्यानंतर लाड कुटुंबियांनी केलेला आक्रोश मने हेलावून टाकणारा होता. अनेकांच डोळे पाणावले.
नाना लाड हे मितभाषीक स्वभावाचे होते. ते कमी बोलत असले तरी परपोपकारीवृत्तीचे होते. कोळंब खडवणनाका परिसरातील महापुरूष देवालयाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग नेहमी असायचा. त्यांच्या आकस्मित निधनामुळे कोळंब परिसरात शोककळा पसरली. नाना लाड यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नव्हते. अधिक
तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
एस. एस. खाडे व पोलीस हेड कॉस्टेबल एस. एस. पवार हे करीत आहेत.













