मालवणातील राज्यस्तरीय नारळ लढवणे स्पर्धेत अलिबागचा शैलेश नाईक विजेता

आमदार निलेश राणे यांनी स्पर्धेचे उद्घाटन करत भव्यदिव्य आयोजनाचे केले कौतुक

उद्योजक सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे स्पर्धा आयोजन

मालवण | प्रतिनिधी : उद्योजक सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या भव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना १ लाख १ हजार १११ रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २४ संघांनी सहभाग घेतला होता. दोन गटांमध्ये खेळविण्यात आलेले सामने अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीचे झाले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच शैलेश नाईक यांनी दमदार कामगिरी करत आपले एकहाती वर्चस्व कायम ठेवले आणि अखेर अंतिम सामन्यात बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सतीश आचरेकर यांच्या हस्ते आमदार राणे यांचा सत्कार करण्यात आला. सतीश आचरेकर यांचे सामाजिक उपक्रम नेहमीच भव्यदिव्य असतात. त्याच धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या भव्य आयोजनाचे आमदार राणे यांनी कौतुक करत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, विश्वास गावकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत आसिफ विकी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ५१ हजार १११ रुपये व आकर्षक चषक, तर पंकज सादये यांनी तृतीय क्रमांक मिळवत २१ हजार १११ रुपये व आकर्षक चषक पटकावला. मनोज मयेकर यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळवत ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक मिळविला. तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून अलिबाग येथील वर्धान घरत, उत्कृष्ट प्रहारसाठी गोवा येथील डॉमनिक (पंकज सादये), तर आकर्षक नारळ म्हणून खारेपाटण येथील तुषार कोळसुलकर यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी सतीश आचरेकर यांनी सांगितले, राजकीय क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. पारंपारिक स्वरूपात असलेला हा नारळ लढवणे खेळ खेळण्याची ही आपली हौस आहे. लहानपणापासून नारळ खेळत आहे. या खेळाचा अधिक प्रसार व्हावा, नारळी पौर्णिमेच्या दिवशी मित्रमंडळींना त्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. आज मालवणवासीयही या स्पर्धेचा मोठा आनंद घेतात. तुल्यबळ संघ सहभागी झाल्याने स्पर्धेला मोठी रंगत आली. असे आचरेकर यांनी सांगत स्पर्धा आयोजनासाठी आनंद आचरेकर, तुषार मसुरकर, नीलेश वेर्णेकर व मॉन्टी नार्वेकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नीलेश वेर्णेकर, संजय घरत, सागर तिगडी, आनंद आचरेकर, मोहन आचरेकर, वैभव मयेकर, मॉन्टी नार्वेकर, मनोज मयेकर, निशाद हिरनाईक, मोहन घरत, बाबा जोशी, विकी चोपडेकर, आशिष नार्वेकर, संजय सारंग, विपुल राऊळ, शैलेश नाईक, मोहन म्हात्रे, शंकर अण्णा घरत, गुणेश हडकर, दीप नार्वेकर, तुषार नार्वेकर, विराज पिळणकर, पप्या कीर, मानस कीर, संकेत हळदणकर आदी उपस्थित होते.

रॉयल ब्रदर्स मित्रमंडळाच्या वतीने सतीश आचरेकर व नीलेश वेर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते दर्पण सादये, कुलराज बांदेकर, रॉनी फर्नांडिस, राज जाधव, हर्ष मिठबावकर, ओंकार यादव, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, भूषण पडवळ, यज्ञेश करंजेकर, कल्पेश मसुरकर, मंदार अंधारी, मिथील हिंदळेकर, रेगन नहोना, भावेश पारकर, फ्रान्सिस नहोना, वेदांत मालवणकर, मॉरीस फर्नांडिस, योगेश मेस्त्री आदी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन सातारा येथील श्रावणी पाटील व मालवण येथील अक्षय मालवणकर यांनी केले.