लैंगिक अत्याचार प्रकरणी वसईतील धर्मगुरू अटकेत; ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

पिंपरीतून पहाटे अटक; सोशल मीडियातून संपर्क
धमक्या देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप

पुण्यातील एका महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात वसईतील धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला पिंपरी येथून अटक केली. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


पुणे : लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी वसईतील धर्मगुरू हृषिकेश वैद्य (३९) याला शनिवारी पहाटे पिंपरी येथून अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, न्यायालयाने आरोपीला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (बलात्कार) आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना पुण्यात घडल्याने प्रकरण मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

तक्रारीनुसार, महिला आणि आरोपी यांची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली होती. काही धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने आरोपी पुण्यात आला आणि डिसेंबर २०२३ मध्ये मांजरी येथील एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपीने मे महिन्यात महिलेला वसई येथे बोलावले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो पतीला पाठवण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. तसेच घटना उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी चार पथके तयार केली होती आणि गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे त्याला अटक केली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात वानवडी न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी वकील कविता कांबळे यांनी आरोपीची कसून चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीने सोशल मीडियावर फोटो टाकले का आणि इतर साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, बचाव पक्षाने आरोपीवर खोटा गुन्हा लावल्याचा दावा केला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.