उबाठाची आंदोलने पुरस्कृत : सावंतवाडीची जनता केसरकरांसोबतच!

देवभक्त केसरकरांवर टीका करणे दुर्दैवी – संजू परब 

सावंतवाडी | प्रतिनिधी : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अत्यंत ठामपणे उभे आहेत. उबाठा गटाचे काही पदाधिकारी कुणाकडून तरी अर्थपूर्ण रसद घेऊन जाणीवपूर्वक आंदोलने करत आहेत, मात्र अशा आंदोलनांमुळे केसरकरांचे महत्त्व तसूभरही कमी होणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी येथे व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना संजू परब यांनी उबाठा गटाच्या टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, उबाठाचे जे लोक आज केसरकरांच्या विरोधात विधाने करत आहेत किंवा आंदोलने करत आहेत, हीच मंडळी काही वर्षांपूर्वी केसरकरांच्या भाकरीवर आपला उदरनिर्वाह करत होती. आज तीच माणसे राजकीय स्वार्थापोटी नाहक टीका करत आहेत. केवळ एखादा फोटो आहे म्हणून कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे पूर्णतः चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

आ. दीपक केसरकर हे चार वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले असून त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. ते निस्सीम देवभक्त आहेत आणि प्रत्येक मंदिरात श्रद्धेने जातात. त्यांचे चारित्र्य आणि वर्तन संपूर्ण सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. उबाठाच्या नेत्यांनी स्वतःच्या टीकेकडे लक्ष द्यावे, कारण त्यांचेही नेते तिथे गेले होते. उद्धव ठाकरेंनी खरातला पाणी दिल्याचा टोलाही यावेळी परब यांनी लगावला.

याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनीही उबाठाच्या आंदोलनावर सडकून टीका केली. आंदोलनासाठी माणसे पकडून आणली जात असून मतदारसंघातील महिला भगिनी मात्र आजही दीपक केसरकर यांच्या पाठीशी खंबीर आहेत. भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संदेश सोनुर्लेकर, संजय गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.