कुणकेरीत वनविभागाची मोठी कारवाई
कारवाईत लाखो रुपयांचे सागवान नग हस्तगत
सावंतवाडी:शासकीय जंगलातून विनापरवाना सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा सावंतवाडी वनविभागाने पर्दाफाश केला आहे. कुणकेरी येथील पाळणे कोंड धरण फाट्यावर पहाटेच्या सुमारास थरारक पाठलाग करून वनविभागाने एक संशयित वाहन जप्त केले. या कारवाईत लाखो रुपयांच्या सागवान नगांसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. राजन लिंगू गावडे, योगेश परब आणि लाडू कुणकेरकर (तिघेही रा. कुणकेरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने आज पहाटे ६:०० वाजण्याच्या सुमारास कुणकेरी येथील पाळणे कोंड धरण फाट्यावर सापळा रचला होता. दरम्यान, संशयास्पद स्थितीत येणारे ‘MH-02-ER-0097’ क्रमांकाचे वाहन दिसताच वनविभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग केला आणि थांबवून तपासणी केली. या वाहनात बेकायदेशीररी्या सागाचे नग भरल्याचे आढळून आले.
सदरचा माल शासकीय जंगलातून चोरून आणल्याचा संशय आल्याने वनविभागाने मालासह वाहन जप्त केले असून, पुढील प्रक्रियेसाठी ते उप्रलं विक्री आगारात आणून ठेवले आहे. या तस्करी प्रकरणी कुणकेरी येथील राजन गावडे, योगेश परब आणि लाडू कुणकेरकर या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे, आणि सावंतवाडी वनक्षेत्रपाल श्री. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी श्री. पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक श्री. सदानंद मोहिते आणि श्री. अक्षय कुंभार यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी श्री. पृथ्वीराज प्रताप हे पुढील कायदेशीर चौकशी व तपास करीत आहेत.













