अटल प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सेकर यांची फेरनिवड

कार्यवाहपदी रघुनाथ तानावडे : पाच वर्षांसाठी सामाजिक कार्याचा विशेष संकल्प

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ‘अटल प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील ५ वर्षांसाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या निवडीनंतर बोलताना ॲड. नकुल पार्सॅकर यांनी पुढील पाच वर्षांचा कार्याचा आराखडा स्पष्ट केला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्याने सामाजिक कामाचा एक नियोजनबद्ध आराखडा प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे. विशेषतः पर्यावरण संवर्धन, करिअर मार्गदर्शन, महिला सुरक्षा, समुपदेशन आणि ग्रामीण रोजगार या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून, जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी नमूद केले की, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावंतवाडी पोलीस ठाणे आवारात गेल्या १२ वर्षांपासून ‘महिला समुपदेशन केंद्र’ यशस्वीपणे चालवले जात आहे. या केंद्राने आतापर्यंत दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला या तीन तालुक्यांतील १,२०० पेक्षा जास्त कौटुंबिक वादांत यशस्वी तोडगा काढून विस्कटणारे संसार वाचवण्याचे महत्त्वपूर्ण काम पोलीस खाते व महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने केले आहे.

या वार्षिक सभेत पुढील पाच वर्षांसाठी सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. नकुल पार्सॅकर, तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. राजशेखर कार्लेकर व श्रीकांत राऊळ यांची निवड झाली. कार्यवाह पदाची जबाबदारी रघुनाथ तानावडे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, सहकार्यवाह म्हणून ॲड. अनुराधा परब आणि खजिनदार म्हणून अर्पिता वाटवे काम पाहणार आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून विक्रम कोटणीस, प्रसाद महाले, जितेंद्र पंडित, मानसी परब आणि बाळकृष्ण लिंगवत यांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. राजेशकुमार गुप्ता, प्रशांत सावळ, सुजाता पडवळ, पुंडलिक दळवी, राजाराम पार्सॅकर आणि सुस्मिता चव्हाण यांची कायम निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सॅकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.