मांदिवली खाण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची हरित लवादात धाव; बेकायदेशीर वृक्ष तोडीचे गंभीर आरोप

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील मांदिवली येथील प्रस्तावित खाणकाम प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अखेर न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारत पुणे येथील हरित लवाद (एनजीटी) मध्ये याचिका दाखल केली आहे. गावकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही संबंधित प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाला अधिकृत पर्यावरणीय मंजुरी मिळण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर झाडतोड, डोंगर कापणी (हिल कटिंग) तसेच उत्खनन करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी कोणत्याही संबंधित शासकीय विभागाची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे पर्यावरणीय नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या संदर्भात हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सर्व्हे क्रमांक ४१२ (मांदिवली) तसेच लगतच्या सर्व्हे क्रमांक ३८४, ३८८, ४०९ आणि ३९६ या क्षेत्रांमध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणावर उत्खनन, बांधकाम आणि झाडतोड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोकलेन मशीनच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या झाडतोडीत सुमारे ४६४ पेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, जी अत्यंत गंभीर पर्यावरणीय उल्लंघन मानली जात आहे.
वन विभागाच्या अधिकृत पंचनाम्यानुसार अब्दुल रहिमान मुकादम, वसीम अहमद मुकादम, नवल रघुनाथ वेदपाठक, दिलदार वहाब मुकादम आणि मेहफुझ अनवर मुकादम यांनी ही झाडतोड केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडतोडीसाठी वन विभागाची कोणतीही वैध परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून, ही कारवाई बेकायदेशीर व दंडनीय ठरते.
दरम्यान, हरित लवादाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी निश्चित केली आहे. तसेच, झाडतोड व इतर पर्यावरणीय उल्लंघनांची खात्री करण्यासाठी दापोली तहसील कार्यालय आणि वन विभागाला सविस्तर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्राथमिक पाहणीदरम्यान काही बाबींची नोंद घेतल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि स्थानिकांच्या हिताविरोधात जाणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला भविष्यातही तीव्र विरोध केला जाईल. या संघर्षामुळे मांदिवलीतील खाण प्रकल्पाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.