सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई
रत्नागिरी: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलमांचे उल्लंघन करून बिबट्याच्या कातड्याची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न सीमाशुल्क विभागाने उधळून लावला आहे. कोल्हापूर शहराजवळ छापा टाकत बिबट्याचा २ कातडींसह ४ जणांना ताब्यात घेतले आहे.
सीमाशुल्क (प्रतिबंधात्मक आणि गुप्तचर) विभागाचे अधीक्षक हिमांशु शर्मा यांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, २९ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर शहरालगतच्या महामार्गावर ही थरारक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर, संदीप कौशिक, निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, ऋतिक कुंभारवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा, हेड हवालदार संजय एम. जाधव आणि हवालदार अभिषेक यादव यांचा समावेश होता.
या अत्यंत वेगवान कारवाईदरम्यान सीमाशुल्क विभागाने बिबट्याची दोन कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली एक ‘मरून रंगाची किया सेल्टोस’ कार जप्त केली आहे. याशिवाय, घटनास्थळावरून चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विविध आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या चार आरोपींपैकी दोन जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवासी असून, इतर दोन जण सातारा आणि लातूर येथील रहिवासी आहेत. या सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील माननीय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.
रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी या प्रकरणाची माहिती देताना जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या वन्यजीव तस्करीच्या घटना निदर्शनास आल्यास ७२१९२१२३०४ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.












