मोटर सायकलची टँकरला धडक, मोटर सायकल स्वाराचा जागीच मृत्यू

वाटुळ- दाभोळे मार्गावर विलवडे रेल्वे स्टेशन नजीकची घटना

लांजा (प्रतिनिधी) भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकलची टँकरला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सोमवार दिनांक ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाटुळ दाभोळे मार्गावर विलवडे रेल्वे स्टेशन नजीक घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद चांद अल्लाउद्दीन बागवान (वय २३ राहणार करदाळ, अक्कलकोट जिल्हा सोलापूर( याने लांजा पोलिसांना दिली आहे. चांद बागवान हा आज सोमवारी दुपारी आपल्या ताब्यातील टँकर (क्रमांक एम एच ४६ सी एल ७५३६) घेऊन वाटुळ दाभोळे मार्गे आंबा घाट ते कोल्हापूर असा चालला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा टँकर लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन नजीक २०० मीटर अंतरावर आला असता स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (क्रमांक एम एच १० सीडी ९६०२) ही मोटरसायकल घेऊन तेजस नरेंद्र देशपांडे (राहणार दुर्वांकुर अपार्टमेंट, हुपरी व्ही टी सी मिरज, जिल्हा सांगली) याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि मोटरसायकल वेगाने चालवून टँकरला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तेजस देशपांडे याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोटरसायकल स्वार तेजस देशपांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.