रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमीला दिल्लीत ‘एक्सलन्स इन डिजिटल ट्रान्सफॉरमेशन’ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी: रत्नागिरीतील अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय ‘फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी’ने (FAMT) शिक्षणातील डिजिटल परिवर्तनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील बहुमान पटकावला आहे. ‘बी डब्लू बिजनेस वर्ल्ड’ (BW Businessworld) आणि ‘बी डब्लू एज्युकेशन’ यांच्या सर्वेक्षणात या महाविद्यालयाला “एक्सलन्स इन डिजिटल ट्रान्सफॉरमेशन इन एज्युकेशन” (शिक्षणातील डिजिटल परिवर्तनातील उत्कृष्टता) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दिल्लीत झाला दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली येथील नेहरू प्लेसस्थित ‘इरॉस हॉटेल’मध्ये २५ मार्च २०२६ रोजी “बी डब्लू बिजनेस वर्ल्ड इंडिया स्मार्ट युनिव्हर्सिटी अवॉर्ड २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाविद्यालयाच्या वतीने प्रा. किशोर भोसले यांनी डॉ. अनुराग बत्रा आणि प्रा. डॉ. रूपमंजरी घोष यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा संगम

भारतीय शिक्षण व्यवस्थेला जागतिक महासत्ता बनवणे या संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यापीठांचे भविष्य घडवण्यात तंत्रज्ञान, धोरण आणि संस्थात्मक नवोपक्रम यांच्या भूमिकेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. परिषदेमध्ये डॉ. अनुराग बत्रा (अध्यक्ष, बी डब्लू बिजनेस वर्ल्ड), श्रीमती सोनल गोयल (सचिव, त्रिपुरा सरकार) आणि इतर दिग्गज मान्यवरांनी डिजिटल पायाभूत सुविधा व नव्या युगातील शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन केले.

निवडीची प्रक्रिया

हे पुरस्कार मिळवण्यासाठी सविस्तर नामांकने आणि श्रेणीनिहाय मूल्यांकनानंतर स्वतंत्र ज्युरी पॅनेलद्वारे निवड करण्यात आली. शैक्षणिक नवोपक्रम, डिजिटल परिवर्तन आणि उद्योग क्षेत्राशी असलेले उत्तम एकत्रीकरण या निकषांवर फिनोलेक्स अकॅडमीची निवड करण्यात आली.

अभिनंदन व कौतुक

१९९६ साली फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष कै. श्री. पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून या महाविद्यालयाची स्थापना झाली. गेल्या ३० वर्षांत या महाविद्यालयाने अभियांत्रिकी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या यशाबद्दल फिनोलेक्स अकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा आणि प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.