डंपर दुचाकी अपघातातील जखमी युवकाचे गोवा येथे निधन!

▪️11 दिवस मृत्यूशी दिली झुंज  

▪️एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

मसुरे | झुंजार पेडणेकर : हिवाळे कसाल मुख्य मार्गावरील ओवळीये रामेश्वर मंदिरा नजीक उतारावर झालेल्या डंपर दुचाकी अपघातातील गंभीर जखमी दुचाकी स्वार मयुरेश मंगेश राणे (23) रा. बांदिवडे पालीयेवाडी, ता.मालवण या तरुणाचे गोवा येथे उपचार चालू असताना रविवारी निधन झाले. सदरची घटना गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी दुपारी 2:30 च्या दरम्याने घडली होती. डंपर चालकाने चुकीच्या मार्गाने येऊन मोटर सायकल ला जोरदार धडक दिल्याने सदर अपघात घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी देत त्यावेळी रस्ता रोको सुद्धा केला होता.

बांदिवडे पालीयेवाडी येथील तरुण मयुरेश राणे हा कुडाळ येथे बजाज दुचाकी शोरूम मध्ये कामाला होता. गुरुवारी गुढीपाडवा असल्याने कुडाळ येथून दुपारी आपली मोटरसायकल [MH 07 AV 8281] ने बांदिवडे येथे जात असता शिरवंडे येथून खडी भरून कुडाळ येथे जाणारा 16 चाकी डंपर [MH 46 BB 2048] हा चालकाने विरुद्ध दिशेला आणल्याने ओवळीये रामेश्वर मंदिर नजीक उतारावर सदर डंपरची मोटरसायकलला जोरदार धडक बसली. या धडकेत मोटर सायकल स्वार मयुरेश राणे याच्या डोक्याला तसेच कंबर, पाठीचा मणका याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यावर कोसळला. यावेळी डंपर चालकाने डंपर रस्त्या बाजूला लावून पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच हिवाळे, ओवळीये, ओसरगाव येथील ग्रामस्थ त्वरित घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी तरुणाला रुग्णवाहिकेद्वारे पडवे येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघाताची माहिती बांदिवडे येथे मिळताच मयुरेश याचे नातेवाईक व बांदिवडे ग्रामस्थांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेतली होती . दरम्यान ग्रामस्थांचा उद्रेक पाहता पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. सायंकाळी 5 वाजल्यापासून एसटी बस सहित इतर वाहनांनाही ग्रामस्थांनी रोखून धरल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांना मिळताच त्या गुरुवारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गंभीर जखमी मयुरेश ला अधिक उपचारसाठी गोवा येथे दाखल करण्यात आले होते. त्याला रक्ताची गरज असल्याने बांदीवडे येथून अनेकांनी गोवा येथे जात रक्तदान सुद्धा केले होते. किडनी तसेच पाठीच्या मणक्यास गंभीर ईजा झाल्याने उपचारास प्रतिसाद न देता रविवारी दुपारी त्याचे निधन झाले.

दरम्यान गंभीर जखमी तरुणाची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याचे कुटुंब त्याच्यावरच अवलंबून आहे. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने सदर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. डंपर चालकाच्या चुकीमुळे मयुरेश राणे याला आपला जीव गमवावा लागला असल्याने तातडीने नुकसान भरपाईची मागणी होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी बांदीवडे स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मयुरेश याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.