खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोरज शेवरवाडी येथील शिक्षक श्री. मंगेश झावरे यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय यशामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
गेल्या १४ वर्षांच्या सेवाकाळात श्री. झावरे यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तालुक्यातील पहिली प्रगत शाळा उभारण्यापासून डिजिटल शाळा संकल्पना राबविणे, टेक्नो टीचर म्हणून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करणे, बदली प्रक्रियेत शिक्षकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे यांसारख्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ‘मैत्री गुणवत्ता’ आणि ‘एकच ध्यास गुणवत्ता’ या गटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
नुकतेच २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या ‘एज्युकेशन आयकॉन समिट 2026’ या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते सपत्नीक श्री. मंगेश झावरे यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, बोरज शेवरवाडी ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक तसेच खेड तालुक्यातील शिक्षकांनी झावरे सरांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












