चार महिन्यांनंतर कुटुंबाची पोलिसांत तक्रार
निष्काळजीपणामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेत एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या या अपघातानंतर तब्बल चार महिन्यांनी मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात केबल तुटून लिफ्ट कोसळली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. या प्रकरणी सोसायटी पदाधिकारी आणि देखभाल करणाऱ्या कंपनीसह एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुणे : तळेगाव दाभाडे परिसरातील निसर्ग हाउसिंग सोसायटीमध्ये घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सोसायटी सदस्य आणि लिफ्ट देखभाल करणाऱ्या खासगी कंपनीच्या संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या घटनेत दिनेश सुरंगे या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरंगे हे सहाव्या मजल्यावरून लिफ्टने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्यांना बाहेर काढण्याचा रहिवाशांनी प्रयत्न सुरू असतानाच लिफ्टची केबल तुटली आणि लिफ्ट जमिनीवर कोसळली. या अपघातात सुरंगे यांना गंभीर दुखापत झाली आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मानसिक धक्क्यात असलेल्या कुटुंबीयांनी काही महिन्यांनी म्हणजेच २८ मार्च २०२६ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत इतर रहिवाशांनीही लिफ्टमध्ये अडकण्याचे प्रकार यापूर्वी घडल्याचे सांगितले, मात्र सोसायटी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे उघड झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. मृत सुरंगे हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून ते तळेगावातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. ते पत्नीसमवेत भाड्याच्या घरात राहत होते आणि घटनेच्या वेळी त्यांची पत्नी गरोदर असल्याने माहेरी गेली होती.
या प्रकरणी पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी तसेच देखभाल जबाबदार व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 106 (1), 125 (अ), 125 (डी), 289 आणि 3 (5) नुसार निष्काळजीपणा, जीव धोक्यात घालणे आणि यंत्रसामग्री हाताळताना दुर्लक्ष यांसारख्या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. एकूण ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.









