पाटपन्हाळे विद्यालयात लो. टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 

पाटपन्हाळे ( वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस.चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमाध्यक्षा व शिक्षकवृंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.एस.घाणेकर , श्री.आर.एम. तोडकरी , श्री.एस.वाय.भिडे , श्री.एस.एम.आंबेकर , सौ.एन.पी. वैद्य हे मान्यवर शिक्षकवृंद उपस्थित होते. माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रमाध्यक्षा व मान्यवर शिक्षकांचे तसेच विद्यार्थी प्रतिनिधींचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वकृत्व उपक्रमात सहभाग घेतला होता.

लोकमान्य टिळकांचा जीवन परिचय , देशकार्यासाठीचे बहुमोल योगदान , भारत देश स्वतंत्र होण्यासाठी लाभलेले योगदान , आदी मुद्द्यांनुसार विद्यार्थ्यांनी वकृत्व सादर केली. कार्यक्रमाध्यक्षा व सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस.एस.चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य , भारत देशासाठी लाभलेले मौलिक योगदान तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले सामाजिक प्रबोधन कार्य , आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीमधील विद्यार्थीनी कु. श्रेयशा सहदेव नरळे हिने केले. कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षकवृंद , सहभागी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आभार मानण्यात आले.