रत्नागिरीतील प्रतिष्ठित इसमाची निर्दोष मुक्तता!

 

रत्नागिरी : जानेवारी 2023 मध्ये पावस म्हावळंगे रस्त्यावर एका मोटार सायकल अपघाताच्या आरोपाखाली आदित्य प्रसन्न गांधी यांचे वर फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. अपघातग्रस्ताने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर भा.द.वि.कलम 279, 337, 338 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपीस विधी सेवा प्राधिकरण मार्फत चालवण्यात येणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाकडून मोफत वकील देण्यात आले होते. लोक अभिरेक्षक कार्यालय रत्नागिरी चे विधी सहाय्यक ॲड. आयुधा अक्षय देसाई यांनी सदर आरोपीची बाजू कोर्टासमोर परिणामकारकरीत्या मांडली .वकील सौ . आयुधा देसाई यांनी केसच्या कामी घेतलेला उलट तपास व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. मधुसूदन महाडिक यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲड. आयुधा देसाई यांना जिल्हा विधी सेवेचे सचिव श्री.निखिल गोसावी सर यांनी मार्गदर्शन केले तसेच लोक अभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य श्री. अजित वायकुळ, विधी सहाय्यक श्री.यतिन अनिल धुरत, विधी सहाय्यक श्रीम. पल्लवी धोत्रे व नव्याने नियुक्त झालेले विधी सहाय्यक श्री. उमेश मुळ्ये यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदरची केस ही पोलिसांमार्फत ‘प्लिड गिल्टी’ म्हणजेच गुन्हा कबूल करण्यासाठी लोकाभिरक्षक कार्यालयाच्या विधी सहाय्यकांकडे आलेली होती अशा केस मध्ये लावण्यात आलेल्या भा.द.वि. कलमांची व्याप्ती न पाहता “दंड भरा म्हणजे तुमची सुटका होईल” असे सांगतात मात्र सर्व गुन्ह्यामध्ये फक्त दंड भरून सुटका होतेच असे नाही. काही कलमांतर्गत दंड व कारावास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद असते. तेव्हा आरोपीने गुन्हा कबूल केल्यावर मे. न्यायालयाला कारावासाचीच शिक्षा सुनावण्याशिवाय पर्याय उरत नाही. तसेच सदर आरोपीने गुन्हा कबूल केल्यास तो दोषसिद्ध अपराधी म्हणून गणला जातो .व भविष्यात सदर इसमाला त्याचे दुषपरिणाम भोगावे लागतात. याचे गांभीर्य पोलीस अधिकारी व आरोपी यांना त्यावेळी लक्षात येत नाही. त्यामुळे लोकाभिरक्षक कार्यालयाचे विधी सहाय्यक आवाहन करतात की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा कबूल करायला सांगितल्यास सदर इसमाने आपल्या वकिलाचा योग्य तो सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा .
आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण हक्क असून त्यासाठी त्याला दर्जेदार विधी सेवा मिळण्याचा हक्क असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकाभिरक्षक कार्यालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी मध्ये देखील लोकाभिरक्षक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. सदर कार्यालयामार्फत कोणत्याही आरोपीला कोणताही भेदभाव न करता मोफत विधी सहाय्य दिले जाते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव श्री. निखिल गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यालयाचे कामकाज चालवले जाते.सद्यस्थितीत लोकाभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य विधी सहाय्यक सल्लागार श्री अजित वायकुळ हे आहेत तसेच लोक अभिरक्षक विधी सहाय्यक म्हणून सौ.आयुधा अक्षय देसाई , श्रीम. पल्लवी परशुराम धोत्रे , श्री. यतिन अनिल धुरत व नव्यानेच नियुक्त झालेले वकील श्री.उमेश उदय मुळ्ये हे सर्व विधी सहाय्यक आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करीत आहेत