जि.प. मिठमुंबरी शाळेचे उपक्रमशील शिक्षक
शिरगाव (प्रतिनिधी) :
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मिठमुंबरी नं. १ येथील उपक्रमशील शिक्षक श्री. सचिन लवू धुरी यांना प्रदान करण्यात आला.
श्री. सचिन धुरी यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात तळागाळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, एसटीएस, एपीजे, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमधील यश, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी तसेच ‘प्रयोगातून शिक्षण’ या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि. २९ मार्च रोजी पुणे येथील ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जि.प. शाळा जालिंदरनगर येथील ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते श्री. धुरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे, अध्यक्षा अर्चना शेंडगे, राज्य प्रमुख मा. श्री. संदीप पाटील तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. श्रीम. शर्मिला बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे होते.
हा पुरस्कारमिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.











