राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंबा आणि काजू उत्पादकांना दिलेल्या मदतीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत, तसेच अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया सांगितल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी या मदतीत वाढ करू असे आश्वासन दिले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी दिली आहे.
मंत्र्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, सध्याच्या मदतीनुसार आंबा उत्पादकांना प्रत्येक झाडामागे केवळ 220 रुपये मिळत आहेत, जी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारने आंबा आणि काजू उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या मुद्द्याची दखल घेत मुख्यमंत्री यांनी तत्काळ अर्थखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत अपुरी असल्याचे मान्य करत, त्यामध्ये वाढ करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले.
राज्य सरकार प्रत्यक्ष कृतीतून आंबा व काजू उत्पादकांच्या मदतीला धावून येईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत महायुती सरकारकडून या संदर्भात ठोस निर्णय होईल.











