मठ ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपच्या कविता घोलेकर यांची बिनविरोध निवड..

वेंगुर्ला : दाजी नाईक

मठ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. कविता आशिष घोलेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज अर्ज छाननीच्या दिवशी दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने घोलकर यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मठ ग्रामपंचायत प्रभाग २ मधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी गावठाण वाडी येथील सौ. कविता आशिष घोलेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पोटनिवडणुकी साठी एकूण दोन महिलांनी अर्ज भरले होते.

आज अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. यावेळी तांत्रिक कारणांमुळे दुसऱ्या महिला उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. परिणामी, सौ. कविता घोलेकर यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले.

या निवडीनंतर मठ गावाच्या सरपंच सौ. रूपाली नाईक, उपसरपंच सौ. सोनिया मटकर, सोसायटीचे चेअरमन सुभाष बोवलेकर, गावडे वाडीचे रहिवासी सचिन आईर, प्रभाग ३ च्या सदस्या सौ. सुप्रिया गावडे, सुशांत गावडे, रवींद्र खानोलकर, उमेश मटकर, अजित नाईक व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सौ. कविता घोलेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.