भाजपा स्थापना दिवस व भाजपा नेते खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा होणार

मालवण तालुक्यात पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन ; भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती 

मालवण | प्रतिनिधी : भाजप पक्ष स्थापन दिन आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस असा दुहेरी आनंद संगम ६ ते १० एप्रिल या कालावधित होत आहे. मालवण तालुका भाजपच्यावतीने तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा अशा विविध विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मालवणमध्ये राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

 

भाजपा स्थापना दिवशी प्रत्येक बूथवार भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

 

 

भाजप तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चिंदरकर बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका सचिव महेश मांजरेकर, तालुका उद्योग व्यापार आघाडी रोहेश गावकर, तालुका सरचिटणीस पंकज सादिये, महिला शहाराध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती चारूशीला आचरेकर, महिमा मयेकर, रश्मी लुडबे, नगरसेविका महानंदा खानोलकर, श्री. भोगावकर, जि प सदस्या क्षमा हडकर, पंचायत समिती उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, सदस्य दीपक सुर्वे, अमिता निवेकर, संतोषी कांदळकर, दाजी सावजी, भाई कासवकर, मंगेश चव्हाण, संदीप हडकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

 

भाजप स्थापना दिनानिमित्ताने ६ एप्रिल रोजी भाजप बूथवर भाजपचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. पक्ष सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच अनेक पदाधिकारी नियुक्तीही करण्यात येणार आहेत. प्रत्येक बुथवर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आजी माजी पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपाविण्यात आलेली आहे, असेही श्री.चिंदरकर म्हणाले आहेत.

 

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुका व शहर भाजकडून मालवणमध्ये राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार रूपये व आकर्षक चषक व इतरही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १० व ११ एप्रिल रोजी टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. याची जबाबदारी जिल्हा बँक संचालक बाबा परब आणि नगरसेवक ललीत चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. ही स्पर्धा टोपीवाला बास्केटबॉल क्लब यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी सांगितले.

 

ग्रामपंचायत पोटनिवडणूक गाव पॅनल माध्यमातून बिनविरोध व्हाव्यात

 

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या पोट निवडणुका होत आहेत. या बिनविरोध होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक ते दिड वर्षांसाठी या निवडणूका होत असल्याने यामध्ये गावातील लोकांना एकत्रित बसून गाव पॅनेलद्वारे निवडणूक बिनविरोध करावी अशी आमची इच्छा आहे. मात्र निवडणुक झाल्यास आम्ही सुद्धा उमेदवार उभे करू असेही चिंदरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.