चिपळूण तालुका दिगंबर जैन समाजोन्नती मंडळातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

चिपळूण : चिपळूण तालुका दिगंबर जैन समाजोन्नती मंडळातर्फे तालुक्यातील कामथे येथे श्री. १००८ भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दिगंबर जैन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महोत्सव दिनी सकाळी साडेसात वाजता महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे यजमान सौ. मधुरा व श्री. मोहन शांताराम नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मुलनायक श्री १००८ अभिनंदननाथ भगवान पंचामृत अभिषेक – सौ. तन्वी व श्री. चेतन दिलीप पाटील, शिखरस्त १००८ मुनिसुव्रतनाथ भगवान पंचामृत अभिषेक – सौ. सुषमा व श्री. भारत रावसाहेब आवटी, श्री. १००८ चिंतामणी पार्श्वनाथ भगवान पंचामृत अभिषेक – सौ. अश्विनी व श्री. अभय दादासाहेब पाचोरे, मानसस्तंभ यर्तृमुख पंचामृत अभिषेक – सौ. अमृता व श्री. सुनिल आप्पासो बाळीकाई यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर श्री. १००८ भगवान महावीर जन्म कल्याणक सोहळा संपन्न झाला. आरती करण्यात आली. उपस्थित लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम उपस्थित होते. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात, भगवान महावीर यांची अहिंसा, शांतता व संयम ही शिकवण प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावी असे आवाहन केले. मंडळाचे माजी अध्यक्ष शशिकांत दगडू ‌मोहिरे यांनी सलग वीस वर्षे मंडळाचे अध्यक्षपद सांभाळल्याबद्दल त्यांना रत्नागिरी भूषण सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष वसंत साळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव श्रीकांत रघुनाथ धने यांनी केलेल्या कामाबद्दल धर्मनिष्ठा गौरवभूषण सन्मानपत्र देवून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

मंडळाने बांधलेल्या सभागृहाचे सुशोभिकरणाचे कामासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे काम महिनाभरात पूर्ण होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे वसंत साळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. पाटील यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.