वेंगुर्ले येथे श्री हनुमान मंदिरात श्री.ची फळपूजा आकर्षण…

विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी सुरू आहे श्री हनुमान जन्मोत्सव…

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले येथे श्री हनुमान मंदिर सेवा न्यास, वेंगुर्ला तर्फे सार्वजनिक “श्री हनुमान जन्मोत्सव २०२६” कार्यक्रमा अंतर्गत आज बुधवारी मंदिरात श्री.ची फळपूजा साकारण्यात आली आहे. दरम्यान उद्या चैत्र शु. पौर्णिमा गुरुवार दि. २ एप्रिल रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे, तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री देव हनुमान मंदीर, वेंगुर्ला (मारुती मंदीर स्टॉप) येथे शनिवार दि. २८ मार्च पासून या उत्सवास प्रारंभ झाला. रोज नित्य पूजा, आरती, भजन आणि रात्री विविध दशावतारी नाटके सादर होत आहेत. पहिल्या दिवशी महापुरुष कलावेंभव दशावतार नाट्य मंडळ, देवबाग यांचे “मुंगूस सर्प संग्राम अर्थात नकुला देवी” नाटक, रविवार दि. २९ मार्च रोजी खानोलकर दशावतार, नाट्य मंडळ, खानोली यांचे “दक्ष उत्पत्ती” नाटक सोमवार दि. ३० मार्च रोजी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचे “भुंगश्री अवतार” नाटक मंगळवार दि. ३१ मार्च रोजी दत्तमाऊली दशावतार, नाट्य मंडळ, दाभोली यांचे “मार्जार” हे नाटक सादर झाले. आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी रामेश्वर दशावतार नाट्य, मंडळ, वेंगुर्ला यांचे “रुई महात्म्य” हे नाटक सादर होणार आहे.

*पहाटे मंगलमय वातावरणात होणार श्री हनुमान जन्मोत्सव*

या मंदिरात मंगलमय वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. पहाटे. ४.३०. वा श्री मारुतीला अभिषेक व पुजा होईल, पहाटे ५.०० वा. ह.भ.प. डॉ. रमेश पाटकर (माणगांव) यांचे सुश्राव्य किर्तन होईल. सकाळी ६ वाजता धार्मिक व मंगलमय वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होणार. त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल तर सायं. ५.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद आणि सांय. ७.०० वा. पार्सेकर दशावतार, नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचे “गोमय वज्रांग धारी” हे नाटक सादर होईल. तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.