महोत्सवातून उलगडणार कासवाचा जीवन क्रम
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर येथे ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवाला पिंपळादेवी बीच गुहागर (वरचापाट) येथे आज 1 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली आहे. कासव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे संपूर्ण एप्रिल महिन्यात गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरती कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निसर्गप्रेमींनी आणि पर्यटकांनी कासवाचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी गुहागरच्या कासव महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कांदळवन कक्ष आणि गुहागर नगरपंचायतीने केले आहे.
गुहागर च्या समुद्र किनारी साधारणपणे रामेश्वर स्मशान भूमी ते बाग या किनारपट्टी वरती ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन केले जाते. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यांवर 6 कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली असून यावर्षी सुद्धा साधारणपणे 186 घरटी गुहागर मध्ये आहेत. या केंद्रांमधुन जवळपास रोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. मागील 2 वर्ष मध्ये महाराष्ट्र मधील सर्वात जास्त कासवांची घरटी आणि अंडी गुहागर मध्ये सापडत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि सुंदर समुद्र किनारा आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कासवांच संवर्धन गुहागर मध्ये होत आहे. निसर्गाचा हा आविष्कार पर्यटकांना प्रत्यक्ष पहाता यावा. वन विभागाच्या शेड्युल्य अ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी. आणि गुहागरातील समुद्र पर्यटनाला बळ मिळावे. या हेतूने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.









