खेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक आणि ठोस कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत. खेड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
राज्यात काही ठिकाणी ज्योतिष शास्त्राचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा भोंदू बाबांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असून, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत, असे कदम यांनी सांगितले.
तसेच, नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या अशा फसव्या प्रकारांना थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आणि तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनीही पुढाकार घेऊन पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
एकूणच, महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंदूगिरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासन सज्ज असून, अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.











