आमदार म्हणून मी या संस्थेसोबत कायम उभा राहीन दिला विश्वास
स्वप्निल कदम :कुडाळ
समाजसेवेचे कार्य सातत्याने आणि निःस्वार्थपणे करणारी माणसं आजच्या काळात दुर्मिळ झाली आहेत. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक किशोर पाटकर यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांसाठी केलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी हे समाजसेवेचे व्रत असेच अखंड सुरू ठेवावे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
कसाल येथील हायस्कूलमध्ये किशोर पाटकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सायकल वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत तब्बल १०० होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार राणे पुढे म्हणाले की, “माझ्या खासदारकीच्या सुरुवातीच्या काळात विकास निधीचे वाटप करताना याच संस्थेतून माझ्या कार्याची सुरुवात झाली. या संस्थेच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढेही आमदार म्हणून मी या संस्थेसोबत कायम उभा राहीन.”
शैक्षणिक संस्था चालवणे हे आजच्या काळात अत्यंत कठीण कार्य असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, “शिक्षणाचा दर्जा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न यांचा समतोल राखताना संस्था चालवणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तरीही श्री कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उत्तम कार्य करत असून त्यांचे मनापासून कौतुक वाटते.”
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाईल , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, संस्थाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, संजय पडते, काका कुडाळकर, सरपंच राजन परब, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, नवीन बांदेकर, पणदूर हायस्कूलचे ग्रंथपाल नरेश परब, यशवंत परब, अवधूत मालनकर, मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि नीलम ताई राणे यांनी संस्थेला वेळोवेळी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. तसेच किशोर पाटकर, महेश परब व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.
यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर आमदार निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढत संवाद साधला. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश महेंद्रकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती बालम यांनी मानले.













