BREAKING: साखरपा जाधववाडीजवळ खाजगी बसला भीषण आग; बस जळून खाक

सुदैवाने सर्व ३० प्रवाशी थोडक्यात बचावले
चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
देवरूख नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली
निलेश जाधव / देवरूख

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर आज शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

पुणे येथून ३० प्रवाशांना घेवून खाजगी बस रत्नागिरीच्या दिशेने येत होती.

ही खाजगी बस साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर येताच बसला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

चालकाने प्रसंगावधान दाखवत बस तात्काळ थांबवली. यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. बसला आग लागल्याची माहिती मिळताच देवरूख नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. बंबाने आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस मनस्वी पावसकर तसेच चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मार्ग बदलून दिला तसेच प्रवाशांना आवश्यक ती मदत केली.