चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मिरजोळी येथील जागृत देवस्थान देवी महालक्ष्मी-साळूबाई देवीची वार्षिक यात्रा रविवार दि. ५ एप्रिल रोजी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चार देवस्थानांच्या पालख्यांचा भेटीचा अनोखा कार्यक्रम होणार आहे.
या यात्रोत्सवात यजमान मिरजोळी देवस्थानसह शिरळ वैजी मालघर, कोंढे, पाग देवस्थानच्या पालख्या सहभागी होणार आहेत. यावेळी निमंत्रित पालख्यांची पूजा, सर्व पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम व त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. पालख्या भेटीनंतर दहिवली बुद्रुक येथील आई त्रिमुखी वरदान मानाई भजनी भारुड कलामंचाचा कार्यक्रम होणार आहे. दि. ६ व ७ एप्रिल रोजी श्री देवी महालक्ष्मी साळूबाई यांचा जागर होणार असून ८ रोजी रोजी दुपारी १ वाजता महानैवद्य होणार असल्याचे ट्रस्ट कमिटीने कळवले आहे.













