हॉटेल हेमंतचे मालक ओंकार संसारे यांचा व्यवसायात पर्यावरणपूरक उपक्रम
आशिष कारेकर गुहागर:
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय करताना पर्यावरणाची जबाबदारी जपणारे उद्योजक कमीच पाहायला मिळतात. मात्र शृंगारतळी येथील तरुण उद्योजक ओंकार यशवंत संसारे यांनी आपल्या कामातून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी सारख्या शहरात आपला हॉटेल व्यवसाय संभाळत पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे.
मूळ जानवळे गावातील संसारे कुटुंबीय गेली अनेक वर्षे शृंगारतळी येथे हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. वडिलांचा व्यवसाय पुढे नेत असताना, ओंकार यांनी त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट सेवा आणि स्वच्छतेचा उच्च दर्जा यांचा समावेश केला. त्यांच्या “हॉटेल हेमंत” ने आज तालुका आणि जिल्हा स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हॉटेल व्यवसायात “ग्राहक हाच देव” या तत्त्वावर विश्वास ठेवत, येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची मनापासून सेवा करण्यावर त्यांचा भर असतो. “अन्नदान हेच श्रेष्ठदान” या विचाराने प्रेरित होऊन, ते आपल्या सेवेत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीत.
ओंकार संसारे यांच्या कार्याची विशेष दखल घ्यावी लागेल ती त्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे यामुळेच त्यांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.
हॉटेलमधून निर्माण होणारे सांडपाणी थेट गटारात सोडण्याऐवजी, त्यांनी आधुनिक बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचे शुद्धीकरण करण्याची व्यवस्था उभारली आहे. हे पाणी विविध प्रयोगशाळांमध्ये तपासून ते सुरक्षित आणि दूषित नसल्याचे सिद्ध झाले आहे.
शुद्ध केलेले हे पाणी कोणालाही त्रास न होता सुरक्षितपणे गटारात सोडले जाते. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करत व्यवसाय करण्याचा एक उत्तम आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
व्यवसाय, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधत प्रामाणिकपणे कार्य करणारे ओंकार संसारे हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या कामातून गावाबद्दलची आपुलकी आणि पर्यावरणाबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते.
ओंकार संसारे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कार्याला “पर्यावरणपूरक उद्योजकतेचे आदर्श उदाहरण” म्हणून पाहिले जात आहे.













