गुहागर तालुक्यातील कांबळेवाडी व देऊळवाडी ग्रामस्थांची एकजूट;
श्रमदानातून उभा राहिला नदीवर बंधारा
गुहागर : प्रतिनिधी
यंदा पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्याने आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य संकटाची चाहूल लागताच गुहागर तालुक्यातील कांबळेवाडी व देऊळवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःच कंबर कसली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मंत्राला अनुसरून दोन्ही वाड्यांच्या ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून नदीवर बंधारा बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले असून, त्यांच्या या जलसंधारणाच्या चळवळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाण्याचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी जास्तीत जास्त साठवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. याच उद्देशाने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कांबळेवाडी व देऊळवाडीतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच ग्रामस्थ एकत्र नदीपात्रात उतरले. प्रत्येकाने आपापल्या परीने श्रमदान करत बंधारा उभारणीच्या कामात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या लोकसहभागातून केवळ जलसंवर्धानाबाबतची गावकऱ्यांची उच्च जागरूकता दिसून आली नाही, तर ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य आणि एकजूटही पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. या श्रमदानाच्या रूपाने उभा राहणाऱ्या बंधाऱ्यामुळे आगामी उन्हाळ्यात गावातील पाणीसाठ्यात भर पडणार असून, जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोलाचा हातभार लागणार आहे.
केवळ तक्रार करत बसण्याऐवजी स्वतःच्या गावाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कांबळेवाडी व देऊळवाडीतील या तडफदार आणि जागरूक ग्रामस्थांच्या उपक्रमामुळे परिसरातील इतर गावांसाठीही एक आदर्श निर्माण झाला आहे. पाणीसमृद्ध भविष्यासाठी ग्रामस्थांनी दिलेला हा लढा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरत आहे.












