राजापूर अर्बन बॅंकेचे सौंदळ येथे ग्राहक सेवा केंद्र, ९ ऑगस्टला शुभारंभ

राजापूर | प्रतिनिधी : डिजिटल बँकींगकडे वाटचाल करताना ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन राजापूर अर्बन बँक दर्जात्मक बँकींग सेवा देताना सौंदळ येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू करत आहे. या ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ दि.9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यामुळे आता सौंदळ पंचक्रोशीतील ग्राहकांना व सभासदांना बँकेच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

सौंदळ हे ओणी आणि पाचल यांचे मध्यवर्ती ठिकाण असून या पंचक्रोशीत सुमारे 30 ते 40 वाड्यांच्या गावांचा समावेश असून सौंदळ येथे सुमारे 200 च्या आसपास घरांची वस्ती असल्याने या ठिकाणी दर बुधवारी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरविला जातो. या करीता सौंदळ येथील स्थानिक मंडळींची बँकींग व्यवस्थेकरीता सातत्याने मागणी असल्याने बँकेचे संचालक मंडळाने त्यांच्या मागणीचा विचार करुन या मध्यवर्ती ठिकाणी बँकींग सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. या पंचक्रोशीतून बँकेला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभेल अशी आशा संचालक मंडळाने व्यक्त केली आहे.

सदर ग्राहक सेवा केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी सौंदळ पंचक्रोशीतील ग्राहकांनी आवर्जून उपस्थित रहावे व आपले बँकींग व्यवहार या सेवा केंद्रामार्पत सुरु करावेत अशी आग्रहाची विनंती संचालक मंडळाचे वतीने बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी व उपाध्यक्ष प्रसाद नारायण मोहरकर यांनी केली आहे.