नादब्रह्म भजन मंडळ रत्नागिरी प्रथम
गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील श्री मारुती मंदिर देवस्थान तर्फे यावर्षी देवस्थानच्या नवीन वास्तूचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने अनेक विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यात नुकतीच संगीत आरती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या संगीत भजन मंडळांची अंतिम स्पर्धा श्री मारुती देवस्थान माखजन येथे घेण्यात आली. रत्नागिरी, दिवेआगर, माणगाव आदी अनेक ठिकाणांहून संगीत भजन मंडळे सहभागी झाली होते. सर्व स्पर्धक मंडळानी वेगवेगळ्या चालीत आपल्या आरत्यांचे सादरीकरण केले. आरत्यांच्या सादरीकरणावर माखजन पंचक्रोशीतील आनंद व्यक्त केला. देवस्थानचे पंच कमिटीचे प्रसन्न बापट, सतीश साठे, संजय रानडे आणि परीक्षक विजय रानडे व सौ.प्राची निमकर-रानडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले, तसेच या स्पर्धेचे आयोजन आणि सूत्रसंचालन श्रीकांत फाटक यांनी केले.
संगीत आरती भजन स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पाच विविध आरती मंडळानी आपली कला सादर केली. या स्पर्धेत नादब्रह्म आरती भजन मंडळ रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. लिमयेवाडी आरती भजन मंडळ रत्नागिरी यांनी द्वितीय क्रमांक व सदगुरु कृपा मंडळ माणगांव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व सहभागी संगीत आरती भजन मंडळानी सर्व प्रकारची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल श्री मारुती देवस्थान माखजन व ग्रामस्थांचे आभार मानले.













