बांद्यात एक्साईजची बेकायदा दारू वाहतूकी विरोधात मोठी कारवाई

१०.३४ लाखांची दारू जप्त

बांदा : प्रतिनिधी : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठा घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. या कारवाईत १० लाख ३४ हजारांची दारू आणि १२ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण २२ लाख ३४ हजर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आंध्रप्रदेश येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाला गोव्याकडून मुंबईच्या दिशेने अवैध मद्यसाठा जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास बांदा येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर सापळा रचण्यात आला. यावेळी संशयास्पद वाटणारा ट्रक (एपी ०२ टीई ५६५९) थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.तपासणी दरम्यान ट्रकच्या केबिनच्या मागे तयार केलेल्या विशेष चोरकप्प्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा लपवल्याचे आढळून आले. यात विविध ब्रँडच्या एकूण १६५२ सीलबंद बाटल्या (८९ बॉक्स) जप्त करण्यात आल्या.

 

जप्त केलेल्या दारूची किंमत १०,३४,००० रुपये असून ट्रकसह एकूण मुद्देमाल २२,३४,००० रुपये आहे. याप्रकरणी ट्रक चालक नल्लाबोतुला जयराम (५६, रा. आंध्रप्रदेश) व पल्ले पवनकुमार रेड्डी (३७, रा. आंध्रप्रदेश) या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिलिंद गरूड, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, मिलिंद माळी, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, एस. आर. सूर्यवंशी आणि अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.