खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण टँकर अपघात प्रकरणी अखेर खेड पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर इथेनॉल रसायन मिसळल्याने गंभीर जलप्रदूषण झाले असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक पाणीपुरवठा योजनांवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून इथेनॉल वाहून नेणारा टँकर अचानक नियंत्रण सुटून पलटी झाला. या अपघातात टँकरमधील मोठ्या प्रमाणातील रासायनिक द्रव थेट नदीच्या पात्रात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण झाले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन तसेच आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रसायनामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या गावांतील पाणीपुरवठा योजना आणि नदीकाठच्या विहिरींचा पाणीपुरवठा काही काळासाठी थांबवण्यात आला होता.
या दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले. सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.












