संगमेश्वर: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरहून कोकणात आलेल्या एका पर्यटकाचा नदीत पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे सोनवी नदीच्या पात्रात रविवारी, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
अजित शंकर बोरगे (वय ३७, रा. राजारामपुरी, शाहूनगर, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित बोरगे हे त्यांचे मावस भाऊ विनोद मोहन कलकटकी आणि मित्र सागर यांच्यासोबत कोल्हापूरहून टाटा सुमो गाडीने (क्र. MH-10-2270) संगमेश्वर येथे आले होते. मित्र सागर याच्या आजोळी फिरण्यासाठी हे सर्वजण आले असताना, सायंकाळच्या सुमारास त्यांनी लोवले येथील सोनवी नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह आवरला नाही.
नदीत पोहण्यासाठी उतरले असताना अजित बोरगे यांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना तातडीने शोधून पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी प्रथम संगमेश्वर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे हलवण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना ‘मृत’ घोषित केले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर आणि संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












