नगरपंचायतीच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
मंडणगड (प्रतिनिधी): मंडणगड शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या अमित इलेक्ट्रॉनिक या दुकानाला शुक्रवारी (दि. 1 ऑगस्ट) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, नगरपंचायतीच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटनेच्या वेळी दुकानाचे मालक अमित गुजर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुकान बंद असतानाही शटरमधून धुर निघताना दिसताच शेजारील दुकानदारांनी आग लागल्याची शक्यता ओळखून तत्काळ मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार हे तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. नगरपंचायतीचे कर्मचारी, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करून मोठा अनर्थ टळवला.
या आगीत अमित इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाच्या वतीने पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक अमित चिले, रमाकांत साळुंखे, विशाल कोकाटे, शिवप्रसाद कमेरिकर तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात सहभागी झाले.











