चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती मुंबई शाखा ग्रामीण चिपळूण व श्री हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने मजरेकौंढर येथे मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध आजारांवरती तपासणी केली जाणार आहे.
कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण यांच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देण्यासाठी आरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात येत आहे. नवरतवाडी येथील कडदोबा कालकाई देवीच्या चैतावली उत्सवानिमित्त तेथील ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये श्री हॉस्पिटल तर्फे बीपी व शुगर तपासणी, महिलांचे आजार, ईसीजी तपासणी व जनरल तपासणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दातांची तपासणी व डोळ्यांची तपासणी सुद्धा या शिबिरामध्ये मोफत केली जाणार आहे. यासाठी कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. त्यांना श्री हॉस्पिटल आणि दंतचिकित्सक व डोळे तपासणी या सर्व डॉक्टरांचे सहकार्य लाभले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना सेवा देण्यासाठी कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूणने जनजागृतीचे धोरण अवलंबले आहे. यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करून सेवा देण्याचा शाखा प्रयत्न करीत आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मजरेकौंढर ग्रामस्थ, पुणे मंडळ व मुंबई मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













