चिपळुणात सुमारे ६४.१५ टक्के मतदान
मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१.२६ टक्के मतदान झाले. यामध्ये २१ हजार ८२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुमारे ६४.१५ टक्के मतदान झाले. तर बुधवारी होणारी मतमोजणी रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या १ जागेसाठी ७ तर नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी ११० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश कदम, काँग्रेसतर्फे सुधीर शिंदे, शिवसेना उबाठातर्फे राजू देवळेकर, समाजवादी पार्टीचे मोईन पेचकर, अपक्ष लियाकत शाह, निशिकांत भोजने निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण ४२ हजार ५८२ मतदार असून यामध्ये २० हजार ९८६ पुरुष तर २१ हजार ५९६ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी ४८ मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात १०.३८ टक्के मतदान झाले. तर ही आकडेवारी टप्प्या-टप्प्याने वाढत गेली. काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळाली. राजकीय पक्षांसह अपक्षांच्या कार्यकर्त्यांनी बूथ उभे केले होते. या बुथवर मतदारांना मतदारयादीतील नाव व क्रमांकची माहिती दिली जात होती.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहावयास मिळाला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी शहरातील काही मतदानकेंद्र परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत काही सुचना केल्या. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१.२६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १० हजार ७७८ पुरुष तर ११ हजार ५० असे एकूण २१ हजार ८२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस अधिकारी फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.









