गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील, शतकोत्तर आणि यशस्वी प्रवास केलेल्या माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,रिक्त असलेल्या अध्यक्ष पदी बुरंबाड गावचे सुपुत्र मनोज दत्ताराम शिंदे यांची बहुमताने निवड झाली आहे.आज झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत हा निर्णय झाला.
मनोज शिंदे हे शाळा समिती चे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.मागच्या श्री आनंद साठे यांच्या कार्यकारी मंडळात मनोज शिंदे यांनी उपाध्यक्ष पद उत्तम पद्धतीने सांभाळले होते.मनोज शिंदे हे बुरंबाड गावचे माजी सरपंच आहेत.सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांची चांगली ओळख असून,परिसरात चांगला जनसंपर्क आहे.
मनोज शिंदे यांचे वडील कै.दत्ताराम शिंदे देखील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेकदा उपाध्यक्ष व संचालक राहिले आहेत.मनोज शिंदे यांची वडिलांपासूनच या शैक्षणिक संस्थेत नाळ जुळलेली आहे.
मनोज शिंदे यांच्या कडे तरुण,अनुभवी चेहरा म्हणून पाहिले जाते.गत निवडणुकीत देखील मनोज शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
त्यांच्या निवडीबद्दल माखजन,आरवली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आता अध्यक्ष म्हणून मनोज शिंदे तर सचिव म्हणून श्रीकांत फाटक आहेत.













