मालवण तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राहक दिन हा शासकीय कार्यक्रम केवळ औपचारिकता राहू नये. तर ग्राहक आयोगाबाबत विद्यार्थी, ग्राहकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे असाच सूर आज राष्ट्रीय ग्राहक दिनात उमटला.मालवण तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी, तो अधिक सजग बनावा, फसविला जाऊ नये, यासाठी राज्यात, देशात ग्राहक पंचायत, ग्राहक मंच कार्यरत आहेत. ग्राहकांना आपल्या हक्कांची माहिती व्हावी. फसवणूक झाल्यास त्याची तक्रार करून कसे निराकरण करण्यात येते याबाबत ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नागेश शिंदे, ग्राहक पंचायत मालवणचे उपाध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, ग्राहक पंचायत मालवणचे संघटक नितीन वाळके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, कमलाकांत कुबल, सुहास हडकर, आनंद तोंडवळकर, एस डी कोयंडे, सुरेल परब, चंद्रकांत गावडे, सिद्देश मलये, विशाल ढोलम, विजय पेडणेकर, सुनील पालव, विलास सांडव, योगेश जाधव यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन वाळके म्हणाले, ग्राहक चळवळीशी जोडलेली माणसं आपल्या जिल्ह्यात आहेत. याचा फायदा ग्राहकांनी करून घेणं गरजेचं आहे. ग्राहक दिनाचा कार्यक्रम औपचारिकता न करता तालुक्यात ग्रामीण भागात असा कार्यक्रम घेतल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी समाजिक संघटना देखील सहकार्य करतील. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याची तक्रार करण्याची मानसिकता ग्राहकांनी दाखवली पाहिजे असे वाळके यांनी सांगितले.

कमलाकांत कुबल म्हणाले, प्रत्येक ठिकाणी ग्राहकाला फसवलं जात. त्यासाठी ग्राहक मंचाकडे दाद मागणे गरजेचे आहे. पण त्यासाठी बिल मिळणे आवश्यक आहे. खोटी केस दाखल करता येणार नाही. तसे केल्यास ग्राहक मंच संबंधितांवर खोटी केस म्हणून कारवाई करू शकतो. जिल्हा, राज्य आणि केंद्र आयोग यासाठी कार्यरत आहेत. या कायद्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले. ग्राहक आयोगाबाबाबत विद्यार्थ्यांमधध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. शासकीय कार्यक्रम आहे हा औपचारिकता राहू नये. तर ग्राहकांना यात सहभागी करून घेणं गरजेचे आहे. आपले अधिकार सर्वानी जाणून घेतले पाहिजे. कायद्याचं सक्षमिकारण झाले आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. तर असा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात व्हायला हवा. अशा कार्यक्रमांना खरेदी विक्री संघाचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे संघाचे अध्यक्ष राजन गावकर यांनी सांगितले.