साकेडी फाट्या जवळील हायवेची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा!

महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता अतुल शिवनीवार यांच्या ठेकेदार कंपनीला सूचना

प्रलंबित कामां बाबत लक्ष वेधल्यानंतर तातडीने काही कामे सुरू

कणकवली (प्रतिनिधी)

महामार्गावर एस एम हायस्कूल नजीक साकेडी फाट्याजवळ सर्विस रस्त्यासह अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही ही कामे धीम्या गतीने सुरू असल्याबाबत महामार्ग प्राधिकरण चे खारेपाटण उप अभियंता अतुल शिवनिवार यांनी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात महत्वपूर्ण बैठक काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी ही कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गेली तीन वर्षाहून अधिक काळ सर्विस रस्त्याचे थांबलेले काम सुरू करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हे काम धिम्या गतीने सुरू असून यासह प्रलंबित येथे असणाऱ्या कामांपैकी उघडी गटारे, त्याचबरोबर गटारांवरती वाढलेली झाडी, पावसाळ्यात गटारांचे पाणी रस्त्यावर येणे, सेफ्टी रेलिंग न बसवणे, तसेच सर्विस रस्त्याच्या अलीकडे साकेडी गावा कडे असे दिशा दर्शवणारे बोर्ड बसवणे अशी अनेक कामे करण्याबाबत महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता अतुल शिवनीवार यांची भेट घेत लक्ष वेधण्यात आले होते. श्री. शिवनीवार यांनीही संपूर्ण कामे स्वतः पाहणी केली.

यावेळी ठेकेदार कंपनीचे कर्मचारी देखील उपस्थित होते. हुबरट येथील सुंदर फर्निचर जवळ असलेल्या गटाराचा आऊटलेट चा काही भाग खचला असून, या ठिकाणी तातडीने सेफ्टी बॅरिकेट किंवा संरक्षण भिंत उभारा अशा सूचना देखील श्री. शिवनीवार यांनी दिल्या. यावेळी केसीसी बिल्डकॉन च्या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाऊ लागल्याने मला कारणे चालणार नाहीत, जी कामे पूर्वीच्या अंदाजपत्रकात आहेत ती कामे पूर्ण करावीच लागतील. व सेफ्टीच्या दृष्टीने जी कामे आहेत ती तातडीने मार्गी लावावी लागतील अन्यथा वरिष्ठ कार्यालयात कंपनीच्या विरोधात अहवाल पाठवला जाईल असा इशारा देखील श्री शिवनीवार यांनी दिला. तसेच साकेडी मधील ही प्रलंबित दाखवलेली सर्व कामे स्वतः ही पुन्हा पाहणी करणार असून, तातडीने ही कामे सुरू करा असे स्पष्ट आदेश श्री. शिवनीवार यांनी दिले. तसेच साकेडी फाट्यावरील पिकप शेड जवळ काही भागांमध्ये खड्डे पडले असून, या ठिकाणी डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली. सर्विस रस्त्याचे गॅस पंपाच्या बाजूचे काम करत असताना पिकप शेड नजीकचे डांबरीकरण करण्याची ग्वाही श्री शिवनीवार यांनी दिली.