एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद ‘ICETEST 2k26’ चे आयोजन

कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (SSPM’s COE, Kankavli) 10 व 11 एप्रिल 2026 रोजी “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एमर्जिंग ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ICETEST 2k26)” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या प्रवाहांवर आधारित असून संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ञ तसेच विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या परिषदेत विविध विषयांवरील संशोधन निबंध सादर करण्याची संधी मिळणार असून ज्ञानविनिमय, नवकल्पना आणि आंतरशाखीय सहकार्याला चालना मिळणार आहे.
परिषदेत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर इंजीनीरिंग, जनरल सायन्स सोबतच विविध उपविषयांचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक समस्यांवर उपाय शोधणे व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ञ व वक्ते सहभागी होणार असून संशोधन क्षेत्रातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे सहाय्यक आयोजक डॉ. एस. एस. कुलकर्णी आणि प्राध्यापक टी. ए. कदम यानी सांगितले.
परिषदेचे संयोजक डॉ. एन. एम. शिवशरण यांनी सांगितले की, “ICETEST 2k26” ही परिषद संशोधकांना त्यांच्या नवकल्पना सादर करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. या माध्यमातून संशोधन क्षेत्रात नवे दृष्टीकोन विकसित होतील.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बडकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थी व संशोधकांना आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती समजून घेण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय परिषदांचे मोठे महत्त्व आहे. ही परिषद ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरेल.
“शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि नवोपक्रम वाढवण्यासाठी अशा परिषदांची आवश्यकता आहे. ICETEST 2k26 मुळे संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल.” असे संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी, नमूद करून आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यासाठी संस्थेचे संस्थापक खासदार श्री नारायणराव राणे साहेब, उपाध्यक्ष आमदार डॉक्टर नीलेशजी राणे साहेब आणि सचिव मंत्री महोदय, श्री नितेशजी राणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी संस्थेमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे अमूल्य सहकार्य लाभले त्यामुळे ही परिषद यशस्वी ठरणार आहे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.