कणकवलीत ABC केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; त्रुटींवर निर्देश

कणकवली : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली येथील प्राणी जन्म नियंत्रण (ABC) केंद्राला सोमवार (दि. १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. यावेळी केंद्रातील नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीसाठी उपलब्ध सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO WRIT PETITION (Civil) No(S). 5 Of 2025 आणि प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, २०२३ नुसार सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्राच्या कामकाजासाठी आवश्यक समितीची स्थापना झाली आहे का, तसेच त्यात प्राणीप्रेमींचा समावेश आहे का याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले. पकडलेल्या कुत्र्यांना त्याच परिसरात सोडल्याची GPS फोटोसह नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

प्रत्येक कुत्र्याचा स्वतंत्र केस पेपर ठेवणे, आहाराची नियमित नोंद करणे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना विलंब न लावता मूळ ठिकाणी सोडण्यावर भर देण्यात आला. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक काळ उपाशी ठेवणे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान काढलेले अवयव फॉर्मालिनमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय आहार साहित्याचा स्टॉक रजिस्टर आणि भेट देणाऱ्यांची नोंद व्हिजिट रजिस्टरमध्ये ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र परिसर स्वच्छ, हवेशीर व नीटनेटका ठेवण्याचे निर्देश देतानाच सर्व कुत्र्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. गरोदर किंवा जखमी कुत्री पकडू नयेत, तसेच सर्व कुत्र्यांचे लसीकरण व टॅगिंग करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या भेटीत उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त विनायक औंधकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे श्री. बिलोलीकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाळीव कुत्र्यांच्या मालकांनीही आपल्या प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.