दोडामार्ग :सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात दुर्मिळ आणि अत्यंत विषारी मानल्या जाणाऱ्या ‘किंग कोब्रा’ (राजनाग) दर्शनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी मोर्ले-बाग येथील संजय मणेरीकर यांच्या निवासी घराच्या अंगणात एक भलामोठा किंग कोब्रा अचानक शिरल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत या सापाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
एक तासाच्या थरारानंतर यश
संजय मणेरीकर यांच्या अंगणात सापाचे दर्शन होताच कुटुंबियांनी तत्काळ वनविभागाला याची कल्पना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. लोकवस्तीत आलेल्या या चपळ सापाला पकडणे जिकिरीचे होते, मात्र वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सावधगिरीने सुमारे एक तासाच्या थरारानंतर या किंग कोब्राला जेरबंद केले. त्यानंतर त्याला सुरक्षित पिशवीत भरून मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
वनविभागाची टीम घटनास्थळी
या बचाव मोहिमेदरम्यान वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मयूर कलगुटकर, लाडू गवस, विश्राम कुबल, विलास खरवत, जतिन पटकारे, बाबू वरख, गोपाळ गवस, संतोष मोर्ये, सत्यवान बेर्डे, राजेश पारधी या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सह्याद्री पट्ट्यात अधिवास वाढला?
गेल्या काही काळापासून दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये किंग कोब्राचे दर्शन वारंवार घडत आहे. हे साप अत्यंत विषारी असले तरी ते निसर्गचक्राचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही वन्यजीव मानवी वस्तीत आढळल्यास त्यांना इजा न करता वनविभागाला कळवावे, असे आवाहन यावेळी वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी केले आहे. वनविभागाच्या या धाडसी कामगिरीबद्दल मोर्ले ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.










