‘वाशिष्ठी’त हाऊसबोटची नयनरम्य सफर; पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठीतील जल पर्यटनासाठी दाखल झालेल्या हाऊसबोटीला आता पर्यटकांच्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वातानुकूलीत हाऊसबोटमधून खाडीतील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतानाच कोकणी पदार्थ, भोजनाची मेजवानी देखील पर्यटकांना घेता येत आहे. मालदोली प्रभाग संघाने सुरू केलेल्या या हाऊसबोटमधून वाशिष्ठी खाडीत सफर करणाऱ्या पर्यटकांना केरळ सारखा बॅकवॉटरचा अनुभव मिळतो. हाऊटबोटमधून वाशिष्ठी खाडीत सफर करण्यासाठी पुणे, सोलापूरहून देखील पर्यटक येऊ लागले आहेत. यामध्ये २ एसी रूम असून एकावेळा १२ लोकांना सफर करता येते.
कोकणातील जलपर्यटनाला चालना मिळावी तसेच बचत गटाच्या महिलांना या व्यवसायातून उभारी मिळण्यासाठी सिंधूरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नगिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पाच हाऊसबोट उपलब्ध करून दिल्या. पालकमंत्री उदय सामंत आणि आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे चिपळूणला दोन अत्याधुनिक हाऊस बोटी मिळाल्या. वर्षभर धक्क्यावर थांबलेल्या या बोटी अखेर पर्यटनासाठी खुल्या झाल्या आहेत. परिणामी गोवळकोट येथून वाशिष्ठी खाडीत जल पर्यटनाची सुरुवात झाली. या हाऊसबोटी केवळ प्रवासाचे साधन नाही तर एक चलनशील निवास व्यवस्था आहेत. यामध्ये दोन वातानुकुलीत रूम, आधुनिक वॉशरूम, संगीत कार्यक्रमासाठी डेक, मुझीक सिस्टीम, स्वतंत्र भोजन कक्ष, कोकणी व्हेज नॉनव्हेज भोजनाचा आस्वाद घेण्याची सुविधा आहे. ३ ते २४ तासांच्या सफरीसाठी ग्रुप टूरची सोय असून दहा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश आहे. गोवळकोट धक्का ते दाभोळ खाडीपर्यंतच्या सफरीत पर्यटकांना कोकणचा खरा अनुभवता येत आहे. हिरव्यागार आंबा काजू नारळाच्या बागा, आकर्षक बंगले, पारंपारिक मच्छीमार व्यवसाय, कांदळवणे, मगरी, रंगीबेरंगी पक्षी आणि मासे हे सर्व अनुभव पर्यटकांना मोहीत टाकतात. दिवा बेटातील सात विहिरी, जंगलातील पशुपक्ष्यांचे दर्शन सफारीला ऐतिहासिक व नैसर्गिक परिमाण देतात.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण उपजिवीका अभियानचे व्यवस्थापक अमोल काटकर व त्यांचे सहकारी या व्यवसायाबाबत प्रभाग संघाला मोलाचे मार्गदर्शन लाभते आहे. वाशिष्ठी खाडीत हाऊसबोटीतून जलपर्यटन सुरू होण्यासाठी व्यवस्थापक काटकर यांनी गेली दोन वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. अग्नीपंख महिला प्रभाग संघ मालदोली यांच्या माध्यमातून ही हाऊसबोट चालवण्यात येत आहे. हाऊस बोटचे सर्व व्यवस्थापन आणि देखरेख प्रभाग संघाच्या माध्यमातून केले जाते. या प्रभाग संघात ३५० गट असून २१ ग्रामसंघाचा समावेश आहे. तर प्रभागातील सुमारे ३६०० महिलांना यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. या एसी हाऊसबोट मधून सफर करण्यासाठी २४ तासाकरिता एका रूमचे भाडे १५ हजार रूपये शल्क असून यामध्ये ५ व्यक्ती राहू शकतात. यामध्ये सकाळी चहा नास्टा, वेलकम ड्रिंक, सायंकाळी सहा नाष्टा, रात्रीच्या जेवनाचा समावेश. १२ तासाकरिता ८ हजार शुल्क असून यात एकवेळचे जेवन, सहा नाष्टा व वेलकम ड्रिंक (विविध प्रकारचे सरबरत) यांचा समावेश आहे. तर केवळ सफारीसाठी ३ तासाकरिता प्रतीव्यक्ती ६९९ रूपये शुल्क आकारले जात आहे. यात केवळ पर्यटकांना वेलकम ड्रिंट दिले जाते. एकावेळी १२ लोकांना यातून सफर करता येऊ शकते.
चौकट-
अग्नीपंख महिला प्रभाग संघ मालदोली तर्फे सुरू असलेल्या वाशिष्ठी खाडीतील हाऊसबोट सफारीला आता पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आहे. परजिल्ह्यातून पर्यटक आगाऊ बुकिंग करू लागलेत. पर्यटकांना उत्तम सुविधा आणि कोकणी जेवन उपलब्ध करून देत आहोत. यामुळेच प्रभाग संघाला २ लाखाचा नफा झाला. यापुढील काळात येथील जलपर्यटनाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-शबनम खडपोलकर,
कोषाध्यक्ष, अग्नीपंख महिला प्रभाग संघ, मालदोली, ता. चिपळूण