देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंत यांचे प्रयत्न

संतोष कोत्रे
लांजा –: आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देशातील पहिले
आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ लांजा तालुक्याला उपलब्ध झाली असून या मॅटचे उद्घाटन सोमवारी शासकीय विश्रामगृह, लांजा येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असूनही त्यांना योग्य सुविधा व क्रीडा साहित्य मिळत नाही, ही उणीव ओळखून आमदार किरण सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच हा सकारात्मक परिणाम असून, अशा प्रकारची अत्याधुनिक मॅट देशात प्रथमच लांज्यात उपलब्ध झाली आहे.
भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ लांजा तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे.
या ‘लेव्हल-३’ मॅटमुळे आता लांजातील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी मिळणार आहे.
मॅटचे उद्घाटन प्रसंगी आमदार किरण सामंत यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर तसेच लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकाऱी यामध्ये अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे मार्गदर्शक परशुराम मासये,उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले आहेत
तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, शीतल आचरेकर,अकॅडमी चे प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, गौरव खेडकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर, योगेश तोंडारे यांसह सर्व खेळाडू व पालक वर्गाने आमदार किरण सामंत यांचे आभार व्यक्त केले.

चौकट –
“आपल्या तालुक्यातील मुला-मुलींना ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर खेळताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. ही मॅट केवळ सुविधा नसून खेळाडूंच्या यशाची पहिली पायरी आहे,” असे मत यावेळी आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले.