वेंगुर्ले शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अर्थार्जनाचे बेरजेचे गणित मांडून प्रत्यक्ष कृतीमधून झाली ४६ हजारांची उलाढाल…

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी आज मंगळवारी शाळेच्या प्रांगणात भरविलेल्या आठवडा बाजाराला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी अर्थार्जनाचे बेरजेचे गणित मांडून प्रत्यक्ष कृतीमधून या बाजारात सुमारे ४६ हजारांची उलाढाल केली असल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे हे दुसरे वर्षे होते. शिक्षणासोबतच मुलांना व्यवहार ज्ञान समजावे या उद्देशाने वेंगुर्ला शाळा नं.१ तर्फे मंगळवारी मुलांच्या सहभागात आठवडा बाजार भरविण्यात आला. याचे उद्घाटन नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सर्व शिक्षक आणि पालक यावेळी उपस्थित होते. खेळाच्या निमित्ताने गजबजणा-या मैदानावर विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडा बाजार लक्षवेधी ठरला. या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, नाश्ता, आंबे, पुरणपोळी, थंडपेय, कोकणी मेवा, नारळ, मोदक, विविध मसाले, भेळ, कलिंगड, सुके मासे आदी विक्रीस ठेवले होते. पालकांसह परिसरातील नागरिकांनी या बाजाराला भेट देत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. सुमारे ४६ हजारांची उलाढाल झाल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली.

या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच पाटकर हायस्कूलच्या शिक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.