सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
राजापूर (वार्ताहर): सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी चित्तरंजन लिंगायत यांची काजूची बाग जळून खाक झाली असून यात त्यांचे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ते काजू बागेच्या ठिकाणी गेले. परंतु तोपर्यंत बाग पुर्णतः आगीच्या भक्षस्थानी पडली होती. अत्यंत मेहनतीने आणि कष्टानी उभी केलेली बाग आगीने भस्मसात झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. चित्तरंजन लिंगायत यांनी शासकीय योजनेतून ही लागवड केली होती. मागील दोन वर्षापासून या बागेतून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत होते. मात्र, कुटुंबांचे एकमेव साधन असलेली बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लिंगायत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
वाऱ्याच्या जोरामुळे आगीने रौद्ररूप धारण करत त्यांच्या शेजारी असलेली सुर्यकांत उर्फ आब्या लिंगायत यांची देखील ४५० काजू आणि ५० आंबा कलमे असलेली बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून यांचे देखील ६ ते ७ सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, अजून अधिकृत पंचनामा झाला नसल्याने नेमकी किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. प्रशासनाने या घटनेचा तत्काळ पंचनामा करून या दोनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.












